वडवणीत पोलिसांचे सर्जिकल स्ट्राईक*२१ झेरॉक्स दुकानांवर कारवाई.
वडवणीत पोलिसांचे सर्जिकल स्ट्राईक
*२१ झेरॉक्स दुकानांवर कारवाई.
*परीक्षा वेळेत दुकान सुरु ठेवणे पडले महागात.
*झेरॉक्स चालकांचा बेमुदत बंद
वडवणी – जिल्हाधिकारी बीड यांनी सध्या सुरु असलेल्या १२ वी व १० वी परिक्षेच्या काळात होणाऱ्या काॅपी रोखण्यासाठी सर्व झेरॉक्स दुकाने परिक्षेच्या वेळेत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तरी त्यांचा हा आदेश न पाळल्याने आज दि.२८ फेब्रुवारी शुक्रवार रोजी वडवणी शहरातील २१ झेरॉक्स दुकानांवर वडवणी पोलिसांनी अक्षरशः सर्जिकल स्ट्राईक करत छापे मारून चालकांवर वडवणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करुन कारवाई केली.
बीड जिल्ह्यात सध्या १२ वीच्या परीक्षा सुरू आहेत. प्रतिवर्षी १२ वी आणि १० वी च्या परीक्षेतजिल्ह्यात काॅपीचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट सुरू असतो. हा डाग पुसून काढण्यासाठी काॅपी मुक्त बीड जिल्हा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली असुन यामध्ये जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन या परीक्षेच्या काळात पेपर वेळेच्या एक तास अगोदर व परीक्षा पेपर सुटल्यानंतर एक तास सर्व झेरॉक्स दुकाने बंद करण्याचे लेखी आदेश दिले होते. तरी हे आदेश डावलून वडवणी शहरातील असंख्य झेरॉक्स चालकांनी आपले झेरॉक्स दुकान सुरु ठेवून दुकान रोजच्या प्रमाणे चालवित होते. ही माहिती मिळाल्यावरून व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार वडवणी पोलिसांनी आज दि.२८ फेब्रुवारी शुक्रवार रोजी वडवणी शहरातील २१ झेरॉक्स दुकानांवर थेट सर्जिकल स्ट्राईक करत छापे मारुन चालकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेवून सर्व दुकानदारावर भा.दं.वि. कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईने संपूर्ण वडवणी तालुक्यात खळबळ उडाली आहे. तसेच शहरातील सर्व झेरॉक्स दुकाने बंद राहिल्याने दिवसभर जनतेला त्रास सहन करावा लागला होता.
चौकट
अन्यायकारक कारवाईच्या निषेधार्थ आजपासून बेमुदत बंद..
वडवणी शहरातील आम्हां सर्व सीएससी, व्हीएलई, व झेरॉक्स दुकान चालकांवर प्रशासनाने अन्यायकारक पद्धतीने कारवाई केली असून झेरॉक्स दुकान बंद ठेवण्यासंदर्भात आम्हांला प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती. तसेच सराईत गुन्हेगाराला पकडावे अशा क्रूरतेने सर्व झेरॉक्स चालकांना पोलिस प्रशासनाने पकडून पोलिस ठाण्यात नेले व चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करीत कारवाई केली. हा प्रकार अतिशय निंदनीय असून या अन्यायकारक कारवाईच्या निषेधार्थ आज दिनांक २९ फेब्रुवारी २०२० शनिवार रोजीपासून वडवणी शहर व तालुक्यातील सर्व सीएससी, व्हीएलई व झेरॉक्स दुकान बेमुदत बंद ठेवणार असल्याची माहिती वडवणी तालुका सीएससी, व्हीएलई व झेरॉक्स दुकान युनियनचे अध्यक्ष पांडुरंग मुंडे यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा