मोफत धान्य;शासनाने चालविली आधार कार्ड धारकांची क्रूर चेष्टा - एस. एम.युसूफ़ जाचक अटींमुळे राशन दुकानदार मोफत वाटपाचे धान्य उचलण्यास तयार नाही!
बीड (प्रतिनिधी) - शासनाकडून आधार कार्ड धारकांसाठी घोषित करण्यात आलेले मोफत धान्य अडीच महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटूनही अजून वाटप करण्यात आले नाही. शिवाय यामध्ये दिवसेंदिवस नवनवीन अटी टाकून शासन मोफत धान्यासाठी आधार कार्ड धारकांची क्रूर चेष्टा करीत असून राशन दुकानदार मोफत वाटपाचे धान्य उचलण्यास तयार नसल्याचे दिसून आले आहे. शासनाचे याबाबतीतले नियोजन आधार कार्ड धारकांना भीक नको पण कुत्रा आवर चा अनुभव देणारे ठरणार असल्याचे मत पत्रकार एस.एम. युसूफ़ यांनी दिलेल्या पत्रकातून व्यक्त केले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, कोरोना महामारी च्या लॉक डाऊन मुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीने बी.पी.एल.(पिवळे) रेशन कार्ड धारकांना केंद्र सरकारकडून राशन दुकानातून नेहमीप्रमाणे अल्प दर व त्यानंतर प्रति मानसी पाच किलो धान्य दरमहा प्रमाणे तीन महिने मोफत देण्यात आले. त्यानंतर ए.पी.एल.(केशरी) रेशन कार्ड धारकांना ८ रुपये प्रतिकिलो दराने गहू तर १२ रुपये प्रति किलो दराने तांदूळ देण्यात आले. ज्यांच्याकडे बी.पी.एल. व ए.पी.एल. यापैकी कोणतेही रेशन कार्ड नाही अशा कुटुंबीयांना त्यांच्या कुटुंब प्रमुखाचे आधार कार्ड पाहून त्यांच्या कुटुंबातील सदस्य संख्येची माहिती घेत प्रति मानसी दरमहा पाच किलो धान्य मोफत देण्याची घोषणा केंद्र शासनाकडून करण्यात आली होती. हे धान्य एप्रिल, मे आणि जून असे तीन महिने देण्यात येणार होते. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, एप्रिल आणि मे हे दोन महिने कधीच संपले आहेत. तर जून महिना देखील आता अर्ध्यापेक्षा जास्त निघून गेला आहे. तरीही केंद्र शासनाकडून आधार कार्ड धारकांना मोफत धान्य देण्याची घोषणा करण्यात आलेला गहू आणि तांदूळ अजून पर्यंत वाटप करण्यात आलेला नाही. त्यात आता शासनाने फर्मान काढले आहे की, राशन वरील मोफत गहू व तांदूळ मिळविण्यासाठी आता फक्त कुटुंब प्रमुखाचे आधार कार्ड नाही तर त्याच्यासह कुटुंबातील सर्व लहान-मोठे व वयोवृद्ध यांचे आधार कार्ड पाहून त्यांचे फोटो राशन दुकानदारांनी घ्यावे व प्रत्येक आधार कार्ड चे फोटो नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दाखवून त्यांची सही व शिक्का यादीवर घ्यावा. मगच मोफत धान्य वाटप करावे. या नवीन अटीमुळे राशन दुकानदार मोफत वाटपाचे धान्य उचलण्यास तयार नसल्याचे दिसून आले आहे. कारण त्यांना आधार कार्ड चे फोटो काढण्याचे जास्तीचे कार्य करावे लागणार आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या सही व शिक्क्यासाठी नगरपरिषदेत हेलपाटे मारावे लागणार आहे. आधार कार्ड धारकांना आपल्या कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड राशन दुकानावर घेऊन जाणे कर्मप्राप्त करून टाकल्याने मोफत धान्यासाठी टाकण्यात आलेली ही नवीन अट राशन दुकानदार आणि आधार कार्ड धारकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. मोफत धान्यासाठी गेल्या तीन महिन्यापासून नवनवीन अटी लादल्या जात असल्याने कोरोना महामारी च्या काळात निर्माण झालेल्या बेरोजगारी व आणीबाणीच्या प्रसंगी केंद्र शासनाने जनतेची क्रूर चेष्टा चालवली असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यामुळे आधार कार्ड धारकांना मोफत धान्य म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर प्रमाणे ठरणार असल्याचे मत पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या पत्रकातून व्यक्त केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा