चित्रपट सृष्टीतील कलाकारांचे गुढ मृत्यू ; चिंतेचा विषय!*

*चित्रपट सृष्टीतील कलाकारांचे गुढ मृत्यू ; चिंतेचा विषय!*

हिंदी चित्रपट सृष्टीला बॉलीवूड आणि मायानगरी ही म्हटले जाते. या माया नगरीमध्ये अभिनय करणाऱ्या कलाकारांच्या गुढ मृत्यूची छाया दिवसेंदिवस गडद होत चालल्याचे वारंवार दिसून येत आहे.
        अलीकडच्या काही वर्षात इथे दिव्या भारती, जिया खान, श्रीदेवी आणि नुकतेच सुशांतसिंग राजपूत यांच्या गुढ मृत्युने ही बाब अधोरेखित होते. कुणाच्या ध्यानीमनी नसताना या सर्व कलाकारांचे अकस्मात मृत्यू झाले. 
        यापैकी श्रीदेवी या एकट्या वयस्क कलाकार होत्या. मात्र दिव्या भारती, जिया खान आणि सुशांत सिंग राजपूत हे अत्यंत कमी वयाचे होते. त्यांचे वय मरण्याचे नव्हतेच. तरीही त्यांच्या बाबतीत असे काय घडले ? की या तिघांनाही अनैसर्गिक व अकल्पित मृत्यूला सामोरे जावे लागले ? हा प्रश्न चित्रपट रसिकांच्या मनाला भेडसावतो आहे. या तिघांच्या समोर चित्रपट सृष्टीत उज्वल भविष्य होते. तिघंही अल्पावधीतच चर्चित व नामवंत चेहरे बनले होते. त्यांचे चित्रपट हि यशस्वी ठरत होते. चित्रपट रसिकांसह तरुण पिढीच्या गळ्यातील ताईत बनल्याने त्यांचे चित्रपट रसिक प्रेक्षक डोक्यावर घेत होते, सुपर डुपर हिट करीत होते. तरीही त्यांचे आयुष्य संपवून असे अचानक निघून जाणे हे सहजासहजी पचविता येत नाही. या कलाकारांचा गुढ मृत्यू चिंतेचा विषय बनला आहे.
          *दिव्या भारती*- हिंदी चित्रपट सृष्टीत येण्यापूर्वी दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत अभिनय करत होती. तिथे नावाजल्या गेल्यानंतर ती हिंदी चित्रपट सृष्टीत आली आणि बघता-बघता आघाडी ची अभिनेत्री बनली. तिचे विश्वात्मा, शोला और शबनम, दिवाना या चित्रपटांनी रसिक प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. या चित्रपटांव्यतिरिक्त तिने दिल का क्या कसूर, जान से प्यारा, बलवान, दुश्मन जमाना, दिल आशना है, गीत, दिल ही तो है, क्षत्रिय, रंग, शतरंज इत्यादी हिंदी चित्रपटात अभिनय केला होता. या शिवाय अनेक दाक्षिणात्य चित्रपटातही चमकली होती. मात्र ती जितक्या लवकर चित्रपट सृष्टीत तारांकित झाली त्यापेक्षा जास्त लवकर तिचे आयुष्य मावळले. चित्रपट सृष्टीतील तिची कारकीर्द १९९० ते १९९३ या फक्त चार वर्षात संपली. चित्रपट सृष्टीत आपले नाणे खणखणीत वाजविणाऱ्या या अभिनेत्री ने १० मे १९९२ साली निर्माता साजिद नाडियादवालाशी लग्न केले होते आणि लग्नाला एक वर्ष पुर्ण होण्यापूर्वीच ५ एप्रिल १९९३ रोजी तिचा राहत्या पाच मजली घराच्या खिडकीतून पडून गुढ मृत्यू झाला. अशाप्रकारे चित्रपटसृष्टीतून एक चांगली अभिनेत्री अकाली निघून गेली.
            *जिया खान* - या अभिनेत्रीने तिची चित्रपट सृष्टीतील कारकीर्द महानायक अमिताभ बच्चन सोबत निःशब्द या चित्रपटातून सुरू केली होती. हा चित्रपट विशेष काही यश मिळवू शकला नाही. परंतु तिने यात दिलेल्या मादक धाडसी दृश्यामुळे तिच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. यानंतर तिने आमिर खान सोबत गजनी, अक्षय कुमार सोबत हाउसफुल असे चित्रपट केले. यादरम्यान तिला सूरज पांचोली सोबत प्रेम झाले. नंतर त्यांच्यात दुरावा आला. यामुळे तिनेही अल्पवयात ३ जून २०१३ साली राहत्या घरात पंख्याला लटकून फाशी घेतली. २००७ साली चित्रपटसृष्टीत येऊन २०११ पर्यंत च्या चार वर्षात अवघ्या तीन-चार चित्रपटात काम करून चित्रपटसृष्टीतूनच नव्हे तर जगातून निघून गेली.
                *श्रीदेवी*- लहानपणापासून चित्रपटात काम करणाऱ्या श्रीदेवी यांनी नैनो मे सपना आणि ता थैया, ता थैया, हो ..... म्हणत हिम्मतवाला चित्रपटाद्वारे जितेंद्र सोबत हिंदी चित्रपट सृष्टीत नायिका म्हणून धडाक्यात पदार्पण केले आणि पाहता-पाहता आपले सौंदर्य, अभिनय व नृत्याची सिनेरसिकांना भूरड घालत नंबर एकचे सिंहासन काबीज केले. नायिका म्हणून कारकीर्द उतरणीला लागण्यास सुरुवात झाल्यावर त्यांनी निर्माता बोनी कपूर यांच्याशी विवाह केला. विवाहानंतर काही काळ चित्रपटांपासून दूर राहिल्या. मात्र मालिनी अय्यर या टीव्ही मालिकेतून पुन्हा एकदा अभिनयाच्या मैदानात आल्या आणि इंग्लिश-विंग्लिश व मॉम अशा चित्रपटातून आपल्या दर्जेदार अभिनयाची चुणूक पुन्हा एकदा दाखवली. पती बोनी कपूर सोबत विदेशात गेल्या असताना थांबलेल्या हॉटेल च्या बाथटब मध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला. 
               *सुशांत सिंग राजपूत*- बिहारच्या पाटणा शहरातील एका छोट्याशा गावात जन्मलेला राजबिंडा व लोभस व्यक्तिमत्व लाभलेला सुशांतसिंग राजपूत हा कलाकार चित्रपटसृष्टीशी कोणतेही संबंध नसलेला. फक्त स्वतःच्या हिमतीवर कठोर मेहनत व जिद्दीच्या जोरावर इंजिनिअरिंगचे शिक्षण अर्धवट सोडून नृत्याची आवड असल्याने डान्स ग्रुप मध्ये जॉईन झाला. त्यातून टीव्हीच्या छोट्या पडद्यावर किस देश मे है मेरा दिल या मालिकेतून त्याने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. परंतु त्याला छोट्या पडद्यावर खरी ओळख मिळाली ती एकता कपूरच्या बालाजी फिल्मस् ने निर्माण केलेल्या पवित्र रिश्ता या मालिकेतून. या मालिकेत त्याने केलेला अभिनय रसिकांच्या पसंतीस उतरला आणि अल्पावधीतच त्याचे हिंदी चित्रपट सृष्टीत काई पो चे या चित्रपटाद्वारे पदार्पण झाले. यानंतर त्याने आमिर खान सारख्या सुपरस्टारच्या पिके या चित्रपटात सरफराज युसूफ़ ही व्यक्तिरेखा अगदी जिवंत केली. त्याची ही भूमिका तो अशी काही जगला की पडद्यावर त्याचा सरफराज युसूफ़ पाहताना सिनेरसिकांना हा सुशांतसिंग राजपूत आहे असे वाटलेच नाही. एवढा तो या भूमिकेशी समरस झाला होता. चित्रपटाच्या क्लायमॅक्स मध्ये शेवटी जेव्हा तो चित्रपटाची नायिका अनुष्का शर्मा अर्थातच जग्गू सोबत फोनवरून अत्यंत हळव्या आवाजात आपलं मन मोकळं करतो तेव्हा संवेदनशील सिनेरसिकांच्या डोळ्यांच्या पापण्या ओल्या होतात. अशाप्रकारे या दृश्यात त्याचा अभिनय व जबरदस्त संवादफेक होती. पिके नंतर त्याने भारतीय क्रिकेट संघाचा माजी व सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर आधारित एम.एस.धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात साकारलेली धोनीची भूमिकाही त्याने क्रिकेटच्या बारकाव्यांसह धोनीच्या लकबी आणि त्याचा जगप्रसिद्ध हेलिकॉप्टर शॉट आत्मसात करून ही भूमिका सुद्धा अक्षरशः जिवंत केली. ही भूमिकाही तो अशी काही जगला की हा चित्रपट पाहणाऱ्यांना हा धोनी नसून सुशांतसिंग राजपूत आहे असे कधीच वाटले नाही. त्याचा सर्वात शेवटी प्रदर्शित झालेला छिछोरे हा चित्रपट ही रसिक प्रेक्षकांची मने जिंकून गेला. यादरम्यान त्याने शुद्ध देसी रोमान्स, डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी, राबता, चंदा मामा दूर के, केदारनाथ, सोन चरैय्या इत्यादी चित्रपटात ही अभिनय केला होता. २०१३ साली चित्रपटसृष्टीत सुरू केलेला त्याचा अभिनयाचा प्रवास २०२० मध्ये त्याच्या आत्महत्येमुळे संपुष्टात आला. १४ जून २०२० रोजी त्याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. 
         अशाप्रकारे त्याच्या मृत्यूमुळे फक्त चित्रपटसृष्टीलाच नाही तर सिनेरसिकांना सुद्धा मोठा धक्का बसला आणि यापूर्वी अशाच अचानकपणे दिव्या भारती, जिया खान आणि श्रीदेवी च्या अचानक झालेल्या गुढ मृत्यूची आठवण सिनेरसिकांच्या मनात ताजी झाली. वरील सर्व कलाकार हे नाव, पैसा, ग्लॅमर कमवून बऱ्यापैकी मोठे झाले होते. तरीसुद्धा त्यांचे अशाप्रकारे मृत्यू होणे हे निश्चितपणे धक्कादायक आहे. 
            जाणारा जातो जीवानिशी - त्यानंतर होते फक्त चौकशी. त्या चौकशीचे फलित काय ? ज्यांच्यावर वहीम असतो ते ही नंतर निर्दोष सुटतात. खरेच त्‍यांच्‍या आत्महत्या होत्या ? अपघात होते ? की हत्या ? याची उकल काही होत नाही. सगळं काही गुलदस्त्यात राहते. तारांकित चित्रपट सृष्टीतील ही एक अंधकारमय किनार आहे. असे म्हटल्यास वावगे ठरू नये. यामुळे चित्रपट सृष्टीतील कलाकारांचे गुढ मृत्यू चिंतेचा विषय ठरत आहे. हे ही तेवढेच खरे !
एस.एम.युसूफ़ 
पत्रकार , बीड. 
संपर्क - 9021 02 3121.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन