प्रशासन आणि बागवान यांच्या मध्ये भरडले जाताहेत ग्राहक - एस.एम.युसूफ़ भाजीपाल्याचे भाव चारपटीने वाढले; सामोपचाराने तिढा सोडविण्याची गरज!


बीड (प्रतिनिधी) - शहरातील आडत मार्केटला प्रशासनाने काही दिवसांपूर्वी सील लावल्याने या निषेधार्थ बागवानांनी बंद पुकारला आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहक नाहक भरडले जात असून सामोपचाराने तिढा सोडविण्याची गरज असल्याचे मत पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या पत्रकातून व्यक्त केले आहे.
            पत्रकात म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या महामारीमुळे शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या लॉक डाऊनने भल्याभल्यांचे कंबरडे मोडले आहे. या परिस्थितीतून सर्वसामान्य जनता कसेतरी रडतखडत जीवन जगत आहे. अनेकांचे व्यवहार डबघाईस आले आहे. तर अनेकांचे बंदही झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्या मोल मजुरांच्या हातांना काम नाही. आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या पोटाची खळगी भरतांना नाकी नऊ येत आहे. या सर्व परिस्थितीची जाणीव वास्तविक पाहता शासन-प्रशासनासह ज्यांचे उद्योग सुरू करण्‍यात, चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे, अशांनी ठेवण्याची आवश्यकता आहे. परंतु याचे प्रशासनासह जीवनावश्यक म्हणून मान्यता असलेल्या भाजीपाला विक्रेते बागवान यांना विसर पडल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने आडत मार्केटला सील ठोकताच बागवानांनी संप पुकारून भाजीपाला आडत बंद करून टाकली आणि  शेतकऱ्यांसह  गल्लीबोळात डोक्यावर टोपले व हात गाड्यांवर भाजीपाला लादून पोटाची खळगी भरणारे हंगामी छोट्या विक्रेत्यांची ससेहोलपट सुरु झाली. ग्रामीण भागातून भाजीपाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसह टोपले आणि हातगाडी घेऊन फिरणारे विक्रेत्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय यामुळे भाजीपाल्याचे भाव चारपटीने वाढून ग्राहकांच्या खिशाला कोरोना लॉक डाऊन सारख्या आणीबाणीच्या काळात मोठ्या प्रमाणात जास्तीची आर्थिक झळ सोसावी लागत आहे. दोन दिवसांपूर्वी २० रुपये किलो असणारे टमाटे आता चक्क ८० ते १०० रुपये, १० रुपयाला  ४ मिळणाऱ्या कोथिंबीरची १ जुडी १० रुपयाला, २० रुपये किलो मिळणारी हिरवी मिरची ८० रुपये, २० रुपये किलो मिळणारे बटाटे ४० रुपये, १० रुपयाला २ ते ३ मिळणाऱ्या मेथीची जुडी १० रुपयाला एक झाली आहे. प्रत्येक भाजी-तरकारी चे भाव प्रशासनाच्या विरोधात बागवानांनी पुकारलेल्या बंदमुळे ८० ते १०० रुपये किलो झाले आहे. यामुळे भाजी मंडईत भाजीपाला खरेदी करण्यास गेलेल्या अनेक सर्वसामान्य ग्राहकांना निराश होऊन आल्यापावली रिकाम्या पिशवीने परतावे लागत आहे. या अवस्थेमुळे "करे कोई-भरे कोई" या म्हणीची आठवण सर्वसामान्य ग्राहकांना येत आहे. अशाप्रकारे सर्वसामान्य ग्राहकांचा अंत पाहण्यात येवू नये. प्रशासन आणि बागवान यांच्यामध्ये सर्वसामान्य ग्राहक नाहक भरडला  जावू नये. म्हणून ग्राहकांचा अंत न पाहता  प्रशासन आणि बागवानांनी  सामोपचाराने निर्णय घेऊन तिढा सोडवावा. असे मत पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी पत्रकातून व्यक्त केले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन