उषा मंगेशकर यांना 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार
उषा मंगेशकर यांना 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार
मुंबई दि. २८ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना जाहीर करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केली.
पाच लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असून राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने सन २०२०-२१ साठीच्या पुरस्कारासाठी ही निवड एकमताने केली आहे. उषा मंगेशकर यांनी आतापर्यंत मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये शेकडो सुमधुर गाणी गायली आहेत. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली गाणी प्रचंड गाजली. मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांसाठी त्यांनी गायलेली सर्वच गाणी आणि राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेल्या लावण्या रसिकांनी डोक्यावर घेतल्या. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गायलेल्या लावण्यांमधील गावरान ठसका रसिकांना विशेष भावला. त्यांनी गायलेली असंख्य भावगीते, भक्तिगीते अतिशय लोकप्रिय आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांनी उषाताईंचे अभिनंदन केले. हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार शासनाने आपल्याला घोषित केल्याबद्दल उषाताई मंगेशकर यांनी आनंद व्यक्त केला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा