१३ सप्टेंबर २०१९ शासन निर्णयाचे विनाअनुदानित शिक्षकांनी घातले श्राद्ध
१३ सप्टेंबर २०१९ शासन निर्णयाचे विनाअनुदानित शिक्षकांनी घातले श्राद्ध
बीड(प्रतिनिधी):-
१३ सप्टेंबर २०१९ रोजी तत्कालीन सरकारने विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याबाबत निर्णय घेतला. या निर्णयानुसार नवीन अनुदान पात्र शाळांना २०% व पूर्वी २०% अनुदान घेत असणाऱ्या शाळांना वाढीव २०% देण्याचा शासन निर्णय घेतला. परंतु वर्ष झाले तरी या निर्णयाची अंमलबजावणी झालीच नाही. शासन निर्णय होऊन एक वर्ष उलटूनही अंमलबजावणी न झाल्याने संपूर्ण राज्यभरात विना अनुदानित शिक्षकांनी या शासन निर्णयाचे वर्ष श्राद्ध घातले.
या बाबत अधिक माहिती अशी की, आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजेच १३ सप्टेंबर २०१९ ला तत्कालीन सरकारने विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याबाबत निर्णय घेतला. यात नवीन शाळांना २०% व पूर्वी २०% अनुदान घेत असणाऱ्या शाळांना वाढीव २०% अशा आशयाचा शासन निर्णय झाला. परंतु आज अखेर याची अंमलबजावणी झालीच नाही. शासन निर्णय होऊन एक वर्ष उलटूनही अंमलबजावणी न झाल्याने संपूर्ण राज्यभरात या शासन निर्णयाचे वर्ष श्राद्ध घालण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष श्री.खंडेराव जगदाळे यांनी दिली.
या वेळी पुढे ते म्हणाले की महाराष्ट्रातील ६० हजार शिक्षकांच्या परिवाराला थेट लाभ व्हावा व विनाअनुदानित शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना पगार सुरु व्हावा म्हणून मागील सरकारने १३ सप्टेंबर २०१९ रोजी विनाअनुदानित शाळांना वाढीव अनुदान टप्पा देण्याचा व नवीन शाळांना २०% नव्याने अनुदान देण्याचा निर्णय घेतला. बघता बघता काळ गेला, वेळ गेला. आज रविवारी या शासन निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाले. दरम्यान नवीन सरकार सत्तेत महाराष्ट्रात आले आणि ६० हजार परिवारांना संजीवनी देणारा निर्णय लालफितीत अडकला.नेमकं काय झालं? आणि पाणी कुठं मुरलं? हे शोधण्याची आता गरज निर्माण झाली आहे. आता परिस्थिती अशी आहे की सत्तेतील नवीन सरकार या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे सोडून शिक्षकांसाठी नविनच अभ्यास समितीचे गठण करत आहे. अर्थातच महाराष्ट्र विधिमंडळाच्या मंत्रिमंडळ बैठकीत पारित झालेल्या निर्णयाला हरताळ फासली जाणार आहे. शासनाने तशी तयारी सुरु केली आहे. म्हणूनच शासनाच्या तुघलकी कारभाराचा निषेध म्हणून एक वर्ष पूर्ण झालेल्या शासन निर्णयाला श्रद्धांजली वाहून श्राद्ध घालण्यात आले अशी महिती श्री जगदाळे यांनी दिली. पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासणारी ही घटना आहे. शिक्षकांना त्यांचा हक्क मिळविण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागतोय. एवढे बलीदान द्यावे लागत आहे. आज दिनांक १३ सप्टेंबर २०२० अखेर लाॕकडाऊन च्या काळात तब्बल २४ शिक्षकांचा अंत झाला आहे. लाज वाटते आम्हांला महाराष्ट्रात जन्माला आल्याची, लाज वाटते आम्हांला मराठी शाळा शिक्षक असल्याची अशी भावना आता या शिक्षकांत निर्माण झालेली असून यासाठी सर्वस्वी जबाबदार शासणाचा लालफितीचा कारभार व शिक्षकांसाठी असलेली राजकीय अनास्था आहे. यामुळे संपूर्ण राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांच्या मनात या सरकारबद्दल तीव्र असंतोष निर्माण होत आहे असे ते म्हणाले दरम्यान महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीचे वतीने 'सांगली ते बारामती' पायी दिंडी काढण्यात आली होती. बारामती शहरात कडक संचारबंदी असल्याने सोमवार 7 सप्टेंबर 2020 ला दिंडी बारामती शहराबाहेर अडविण्यात आली. तेंव्हापासून आज अखेर बारामतीच्या वेशीवर कृती समितीचे शिलेदार तळ ठोकून आहेत. आज तेथीलच एका शाळेत हे वर्ष श्राद्ध घालण्यात आले. या वेळी सांगली जिल्हा अध्यक्ष श्री.संतोष जत्ते, सचिव श्री.प्रमोद पाटील,श्री.राहुल शिंदे, श्री.धनाजी जाधव, श्री.आलीम शेख इत्यादी विनाअनुदानित शिक्षक उपस्थित होते.
------------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा