आ.मेटे साहेब, तुम्ही तरी खासबाग-मोमीनपुरा जोडणारा बिंदुसरा नदी वर पूल बनवून द्या - एस.एम.युसूफ
आ.मेटे साहेब, तुम्ही तरी खासबाग-मोमीनपुरा जोडणारा बिंदुसरा नदी वर पूल बनवून द्या - एस.एम.युसूफ
बीड (प्रतिनिधी) - नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक असलेला खासबाग-मोमीनपुरा या मोठ्या प्रभागांना जोडणारा बिंदुसरा नदीवर पूल जनतेसाठी बनवून द्यावा असे साकडे पत्रकार एस.एम.युसूफ यांनी आ. मेटे यांना घातले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मोमीनपुरा, मुहम्मदीया कॉलनी, बीड मामला, खासबाग, शहेनशहा नगर, गणेश नगर, आसेफ नगर, विद्यानगर (पूर्व-पश्चिम), शिवाजीनगर, मित्र नगर, दत्तनगर, त्रिमूर्ती कॉलनी, राजुरी वेस, धांडे गल्ली, तेरवी लाईन, अज़ीज़पुरा, खंदक, कागदी वेस, हत्तीखाना या प्रभागांसह फ्रूट व आडत मार्केट, जिल्हा रुग्णालय, भाजी मार्केट, बाजारपेठ यासह खासबाग देवी मंदिर, भगवान बाबा प्रतिष्ठान स्मशानभूमी, महानुभाव मंदिर, तकिया मस्जिद कब्रस्तान, जमाअत-ए-महेदविया दर्गाह दायरा कब्रस्तान व दायरा कब्रस्तानकडे जाण्या-येण्यासाठी पुल नसल्याने बिंदुसरा नदीतील हा धोक्याचा मार्ग वापरला जातो. यामुळे येथे पूल निर्माण करावा ही मागणी वर्षानुवर्षांपासून होत आहे. मात्र आतापर्यंत या मागणीला वेळोवेळी निवडून आलेल्या प्रत्येक स्थानिक आमदार व नगराध्यक्षाने वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या आहेत. जनतेची क्रूरचेष्टा केल्यासारखे नदी पात्रात चार सिमेंट पाईप टाकून त्यावर नदीतील रोडा व काही मुरूम अंथरून कच्चाच पूल बनवला जातोय. पावसाळा आला की, नदीला आलेल्या पुरात हा कच्चा पूल वाहून जातो. या वर्षी तर हा कच्चा पूल जून महिन्यात पावसाळा सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत एक-दोन नव्हे तर चार वेळेस वाहून गेला. नदीतल्या पाण्याचा प्रवाह थोडा कमी झाला की नागरिक जोखीम घेत नदीपात्रातून ये-जा करतात. परंतु याचे कुठलेही सोयरसुतक स्थानिक आमदार व नगराध्यक्षांना नसल्याचे वारंवार दिसून येत असल्याने आता मेटे साहेब जसे बार्शी रोड चा बिंदुसरा नदीवरील पूल आपण बनवून दिला तसाच आता खासबाग देवी मंदिर चौक ते जिल्हा परिषद उर्दू शाळा ढगे कॉलनी बायपास पर्यंत आवश्यक असलेला खासबाग-मोमीनपुरा जोडणारा बिंदुसरा नदीवर पूल जनतेसाठी बनवून द्यावा असे साकडे पत्रकार एस.एम.युसूफ यांनी आमदार मेटेंना दिलेल्या पत्रकातून घातले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा