बीड जिल्हा कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचे अकाली निधन
बीड जिल्हा कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचे अकाली निधन
*राष्ट्रपती पदकाचे मानकरी*
*सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान..!*
*दहशतवादी कसाबची जेलमध्ये निगराणी करण्याची यशस्वी जबाबदारी पार पाडली
बीड दि.५ (प्रतिनिधी)
बीड जिल्हा कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचे कोरोनामुळे बुधवार दिनांक ४ रोजी पहाटे निधन झाले. निधना समयी ते ४५ वर्ष होते. सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे होते. त्यांच्या निधनामुळे समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी दुःख व्यक्त केले. दहशतवादी कसाबची जेलमध्ये निगराणी करण्याची जबाबदारी पार पाडल्यामुळे कांबळे यांना राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आले होते.
बीड येथील कारागृहाचे सहाय्यक तुरूंगाधिकारी संजय कांबळे हे गेल्या दोन वर्षापूर्वी बीड येथे बदलून आले होते. अतिशय कर्तव्य दक्ष आणि प्रमाणीक अधिकारी अशी त्यांची ओळख होती. बीड जिल्ह्यात आल्यानंतर सामाजिक कामाची आवड असलेल्या कांबळे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या मानसिकतेत बदल व्हावा, त्यांच्यातील दोष कमी व्हावेत यासाठी त्यांनी तुरुंगात वेगवेगळे उपक्रम राबविले होते. विशेष म्हणजे संजय कांबळे हे बीडला येण्यापूर्वी मुंबईच्या तिहार कारागृहात कार्यरत होते. या कारागृहामध्ये अतिरेकी कसाब याला ठेवण्यात आले होते . कसाबवर निगराणी ठेवण्याची जबाबदारी कर्तव्यदक्ष असलेल्या संजय यांच्यावर सोपविण्यात आली होती. एवढेच नव्हेतर संजय दत्त तुरूंगात असताना त्याच्यावर निगराणी ठेवण्याची जबाबदारी देखील कांबळे यांनी पार पाडली होती. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले होते.
बीड येथे कार्यरत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली. बीड शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेवून ते घरी देखील परतले होते. परंतु मंगळवारी रात्री अचानकपणे त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करावे लागले. परंतु डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही व कोरोनामुळे संजय कांबळे यांचे निधन झाले . नांदेड जिल्ह्यातील पुसद येथील रहिवाशी असलेल्या संजय कांबळे यांनी ज्या ज्या ठिकाणी सेवा दिली त्या त्या ठिकाणी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली असल्यामुळे त्यांच्या निधनानंतर अनेकांनी दुःख व्यक्त केले.
*धाडसी आणि कर्तृत्ववान अधिकारी - ना.धनंजय मुंडे*
तुरुंगाधिकारी संजय कांबळे यांच्या निधनाची बातमी समजताच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दुःख व्यक्त केले. या वेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय कांबळे यांची कोरोणा विरुद्धची झुंज अपयशी ठरल्याचे सांगताना ते एक धाडसी आणि कर्तृत्ववान अधिकारी म्हणून परिचित होते. त्यांच्या कुटूंबियांवर कोसळलेल्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा