दिवंगत डॉ.राजीव दीक्षित यांची इच्छा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर पूर्ण करीत आहेत - एस.एम.युसूफ
दिवंगत डॉ.राजीव दीक्षित यांची इच्छा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर पूर्ण करीत आहेत - एस.एम.युसूफ
बीड (प्रतिनिधी) - दिवंगत समाजसुधारक डॉक्टर राजीव दीक्षित यांची इच्छा राजकारणी पूर्ण करो अथवा न करो परंतु विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर पूर्ण करीत असल्याचे मत पत्रकार एस.एम.युसूफ यांनी दिलेल्या पत्रकातून व्यक्त करत त्यांच्या या साधेपणाला सलाम केले आहे.
याविषयी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, बीड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा विद्यमान विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे सपत्नीक औरंगाबाद येथील भाजी मंडईतून भाजीपाला खरेदी करून भरलेली पिशवी स्वतःच्या खांद्यावर उचलून जात असल्याचे फोटो प्रथम सोशल मीडियाच्या माध्यमातून नंतर वृत्तपत्रांच्या माध्यमातून सर्वांसमोर आले. हे फोटो नेमके त्यांचेच आहेत का ? अशी विचारणा भ्रमणध्वनीद्वारे काही वृत्तपत्राच्या संपादकांनी त्यांच्याकडे केली असता त्यांनी,"हो माझेच आहेत आणि त्याच्यात काही विशेष नाविन्य वगैरे नाही. ते माझे नेहमीचे रुटीन आहे" असे उत्तर दिले आहे. त्यांच्या या उत्तरामुळे पटकन आठवण आली ती दिवंगत समाज सुधारक डॉक्टर राजीव दीक्षित यांची. डॉक्टर राजीव दीक्षित यांनी एकदा समाज प्रबोधन कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले होते की,"जगात विकसित झालेल्या मोठमोठ्या देशात तिथले राष्ट्रपती, पंतप्रधान हे संध्याकाळी पाच वाजेनंतर हातात पिशवी घेऊन स्वतः जातीने भाजी मंडईत जाऊन भाजीपाला खरेदी करतात. या कृतीची त्यांना कधी लाज वाटत नाही. की ते आपला बडेजाव मिरवित नाहीत. यावेळी त्यांच्यासोबत झेड किंवा झेड प्लस अथवा अन्य प्रकारची सुरक्षा सेवा हि नसते. ते सर्व सामान्यांसारखे भाजीपाला खरेदी करून आपल्या घरी नेतात. असे आपल्या भारतात का होऊ शकत नाही ?" असा प्रश्नही डॉक्टर राजीव दीक्षित यांनी उपस्थित केला होता. आज जर ते जिवंत असते तर विभागीय आयुक्त सारख्या मोठ्या पदावर असलेल्या सुनील केंद्रेकर यांना सपत्निक भाजी मंडई मध्ये जाऊन भाजीपाला खरेदी करत असताना चे फोटो त्यांच्या पाहण्यात आले असते तर निश्चितच त्यांना सुनील केंद्रेकरांचा अभिमान वाटला असता. हे नक्की ! मात्र त्यांच्या पश्चात का होईना राजकारणी नाही तर निदान आपल्या येथील केंद्रेकरांसारखे कर्तव्यदक्ष अधिकारी डॉक्टर राजीव दीक्षित सारख्या प्रगाढ ज्ञान असलेल्या समाजसुधारकाची इच्छा पूर्ण करीत आहेत. तेव्हा केंद्रेकरांच्या या साधेपणाला आपसुकच हात जोडून सलाम करावेसे वाटते. असे मत पत्रकार एस.एम.युसूफ यांनी दिलेल्या पत्रकातून व्यक्त केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा