अन्नभेसळ प्रशासनाने गोडतेल, खवा, दूध यांमधील भेसळ समाजासमोर आणून धडक कारवाया कराव्यात;उंटावरून शेळ्या हाकू नयेत! भेसळ ओळखण्यासाठी प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित कराव्यात - एस.एम.युसूफ

अन्नभेसळ प्रशासनाने गोडतेल, खवा, दूध यांमधील भेसळ समाजासमोर आणून धडक कारवाया कराव्यात;उंटावरून शेळ्या हाकू नयेत!

भेसळ ओळखण्यासाठी प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित कराव्यात -   एस.एम.युसूफ 

बीड (प्रतिनिधी) - दररोज खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये वापरले जाणारे गोडतेल, खवा आणि दुधामध्ये मोठ्या प्रमाणात सुरु असलेली भेसळ समाजासमोर आणून भेसळ करणाऱ्यांवर अन्नभेसळ प्रशासनाने धडक कारवाया करण्याची मोहीम सुरू करावी. उंटावरून शेळ्या हाकू नयेत तसेच भेसळ ओळखण्यासाठी जिल्हाभरात प्रात्यक्षिक कार्यशाळांचे आयोजन  करण्यात यावे. अशी मागणी पत्रकार एस.एम.युसूफ यांनी दिलेल्या पत्रकातून केली आहे.
         याविषयी दिलेल्या पत्रकात सविस्तर नमूद केले आहे की, महागाईच्या या काळात गोडतेल, खवा आणि दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याचे समाजातील जागरूक नागरिक उघड-उघड बोलून दाखवत आहेत. तसेच याविषयी अनेकदा अन्नभेसळ प्रशासनाकडे तक्रारीही केल्या जातात. या पदार्थांत करण्यात येत असलेल्या भेसळीचा पर्दाफाश करावा आणि सत्य समाजासमोर आणावे. असे आवाहन अनेकदा केले जाते. परंतु अन्नभेसळ प्रशासन यावर कुठलीही कारवाई करीत नाही. तसेच कुणी याविषयी तक्रार किंवा निवेदन देण्याकरिता कार्यालयात गेल्यास सांगितले जाते की, "तुम्ही पुरावा आणा आम्ही कारवाई करू." आता जर तक्रारदारालाच पुरावे गोळा करायला लावायचे असेल तर मग अन्नभेसळ चे कार्यालय व तेथील अधिकारी आणि कर्मचारी फक्त उंटावरून शेळ्या हाकायला ठेवलेत काय ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडत आहे. या पदार्थांमध्ये होत असलेल्या भेसळीमुळे जनतेच्या आरोग्यावर मोठ्याप्रमाणात दुष्परिणाम होतो आहे. आरोग्याच्या समस्या उभ्या राहून आजारी पडल्याने  औषधोपचारासाठी दवाखान्यात जाऊन  डॉक्टर आणि औषधींचा  फटका जनतेला हकनाक सोसावा लागत आहे. या पदार्थात करण्यात येत असलेली भेसळ व त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामापासून  जनतेला वाचविण्यासाठी अन्नभेसळ प्रशासनाने आपल्यास्तरावर धडक कारवाया करून यातील भेसळीचा प्रकार  समाजासमोर आणावा. यामध्ये कशाप्रकारे भेसळ केली जाते ? केलेली भेसळ कशी ओळखावी ? याचे प्रात्यक्षिक दाखविण्याकरिता अन्नभेसळ कार्यालयामार्फत समाजासाठी प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित करण्यात यावी. जेणेकरून या पदार्थांमध्ये केलेली भेसळ सर्वसामान्यांनाही ओळखता येईल आणि भेसळीला आळा बसेल. असे प्रतिपादन पत्रकार एस.एम.युसूफ यांनी दिलेल्या पत्रकातून केले आहे.
१) चौकट -
गोडतेलाचे गोडगुपित ....
खाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तेलामध्ये सर्वात चांगले आणि अनेकजण प्राथमिकता देत असलेले तेल म्हणजे करडईचे तेल. मात्र अलीकडच्या काही वर्षात शेतकऱ्यांनी करडईची लागवड फार मोठ्या प्रमाणात कमी करून टाकल्याने करडईचे पिक फार कमी झाले आहे. यामुळे करडईचे तेल खाणाऱ्यांनाही आता याच्या तेलाचा विसर पडत चालला आहे. करडई नंतर शेंगदाणे, सूर्यफूल, सोयाबीन, सरकी यांचे तेल खाण्यासाठी वापरले जाते. परंतु वास्तविकता अशी आहे की, या सर्व तेलबियांपासून तेल काढायचे म्हटले तर ते एक किलो तेल साठी तिप्पट किंवा चौपट लागतात. त्या तेलबियांच्या रकमेपेक्षा स्वस्त त्यांचे तेल विकले जाते. या सर्व तेल बिया गाळण्यासाठी लागणारे श्रम वेगळे, त्यावर होणारा खर्च वेगळाच. म्हणून इथेच यातील लोच्या लक्षात येतो. तेल काढल्यानंतर या सर्व तेलबियांचीच रक्कम  निघत नाही तर मग  लागती पेक्षा कमी किमतीमध्ये यांचे तेल विकणे निर्मात्याला कसे परवडते ? हा फार मोठा प्रश्न यामुळे समोर येतो. याचाच अर्थ या सर्व गोडतेलात भेसळीचे मोठे गोडगुपित आहे! 
२) चौकट - 
खव्याची गोष्ट ही वेगळी नाहीच !
एक किलो खवा बनविण्यासाठी साधारणपणे पाच लिटर निख्खे दूध (अर्थातच पाणी न मिसळलेले) लागते. सध्या असे दूध ६० रुपये प्रतिलिटर दराने मिळते. याचा अर्थ ३०० रुपयाचे दूध घोटल्यानंतर एक किलो खवा मिळतो. यासाठी लागणारी मेहनत आणि जळतणं वेगळीच. तरीसुद्धा बाजारात कुठेही २०० रुपये प्रति किलो दराने सर्रासपणे खवा मिळतो. म्हणजेच खव्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते.
३) चौकट - 
हे दूधच आहे की आणखीन काही ......?
दुधात मोठ्या प्रमाणात मानवासाठी आवश्यक असलेली जीवनसत्वे असतात. त्याच दुधात जर भेसळ करण्यात आली तर तेच दुध मानवासाठी अपायकारक ठरू शकते. सध्या कोऱ्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये ६० रुपये प्रति लिटर प्रमाणे दूध विकले जात आहे. पूर्वी जिथे सकाळी १० वाजेनंतर कपभर दूध भेटत नसे, तिथे आता पहाटे पासून ते रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत कोऱ्या पिशव्यांमध्ये शहरभरातील रस्त्यांवर हवे तेवढे दूध मिळत आहे. वर्तमानात पूर्वीपेक्षा दूध दुभत्याचे धंदा करणारे शेतकरी कमी झालेत. चारी दिशांनी मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती वाढल्याने शेतजमीनी कमी झालेल्या आहेत. खाणाऱ्या-पिणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तरीसुद्धा कोऱ्या पिशव्यात दुधाची गंगा वाहते आहे.
४) चौकट - 
अपायकारक घटना घडल्यास जबाबदार कोण ?
पॅकिंगचे गोडतेल असल्यास त्यावर कंपनीचे नाव व पत्ता असतो. परंतु सुट्टे तेल घेतल्यास त्याचा कोणताही थांगपत्ता नसतो. 
खवा ही कुठं बनविला ? कोणी बनविला ? त्याचाही थांगपत्ता नसतो. तोही खुलाच विकण्यात येतो. 
दूध जिथे पूर्वी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये शासनासह इतर खाजगी दूधडेअरी चे नाव व पत्ता इत्यादी सह सर्व माहिती मुद्रित करून विकले जायचे, तिथे आता मात्र कोऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ज्यावर ना दूध डेअरी चे नाव, ना पत्ता, ना उत्पादन कर्ता कशाकशाचाच थांगपत्ता नसतो. दूध कशाचे ?कुणाचे ? विकतोय कोण ? सगळं काही अनाकलनीय आहे. अशा अवस्थेमध्ये जर या पदार्थांपासून अपायकारक घटना घडल्या तर त्याचे निवारण कोण करेल ? कसे करेल ? त्याला जबाबदार कोण राहील ? अशा प्रश्नांची उत्तरे अन्नभेसळ प्रशासनाकडे आहेत का ? त्यांना याचे गांभीर्य आहे का ? असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन