राज्यात लॉकडाऊनची शक्यता उद्या होणार सर्वपक्षीय बैठक
राज्यात लॉकडाऊनची शक्यता
उद्या होणार सर्वपक्षीय बैठक
मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी): गेले आठवडाभर लादलेले कडक निर्बंध आणि वीकेंड लॉकडाऊननंतर कोरोना आटोक्यात न आल्यास राज्यात किमान तीन आठवड्याचा संपूर्ण लॉकडाऊन लावला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
राज्यात कडक निर्बंध लादूनही परिस्थिती बदलल्याचे चित्र नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील उपाययोजनां बाबत उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे सरकार आता राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा विचार करत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित असणार आहेत.
राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीत विरोधी पक्षाचे मत घेतले जाईल, असे विजय वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्रात प्रत्येक शहरात दररोज हजारांच्या घरात कोरोना रुग्ण दाखल होत आहेत. मृत्यूदरही वाढल्याने स्मशानभूमी फुल्ल झाल्या आहेत असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
लोकल ही ठप्प होण्याची शक्यता
पुढच्या लॉकडाऊनमध्ये कदाचित मुंबईच्या उपनगरी लोकलला पुन्हा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. लोकलमधील गर्दी कोरोना प्रसाराचे कारण ठरत आहे, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. लोकलची गर्दी नियंत्रणात येत नसल्याने लोकल बंद करण्याचा विचारही सरकार करत असल्याचे बोलले जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा