आदर्श व विनम्रतेचे प्रतिक प्रा. शिवाजीराव (दादा) रानमारे

आदर्श व विनम्रतेचे प्रतिक प्रा. शिवाजीराव (दादा) रानमारे


     सरस्वती भवन वरिष्ठ महाविद्यालय औरंगाबादचे प्रा. शिवाजीराव सदाशिवराव रानमारे म्हणजेच आम्हा सर्वांचे दादा यांनी जगाचा निरोप घेतला,ही वार्ता ऐकून मन अगदी सुन्न झाले. ते धनगर जवळका गावचे एक आदर्श सुपुत्र होते. त्यांच्या निधनाच्या वार्तेने संपूर्ण गाव व त्यांच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्ती हळहळला. दादांमध्ये विनम्रता व आदर्श हे गुण तर होतेच त्याच बरोबर प्रत्येका विषयी तळमळ त्यांच्या मनात सदैव असायची. आम्ही लहान असताना त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण चालू होते. त्यावेळेस आमचे आई-वडील व गावातील मोठी माणसे आम्हाला दादां सारखे शिकावे  व वागावे असे सांगायचे. त्यावेळेस दादा वयाने तरुण होते पण अगदी वयोवृद्ध माणसे सुद्धा त्यांचा आदर करायचे. कारण दादा ही प्रत्येकाचा आदर करत होते. गावातील प्रत्येक विद्यार्थ्याला ते अभ्यासाविषयी खुप तन्मयतेने मार्गदर्शन करत असे. सुरुवातीला त्यांनी प्रियदर्शनी विद्यालय पाटोदा येथे शिक्षकाची नोकरी केली होती.पद्मभूषण वसंत दादा पाटील महाविद्यालय पाटोदा येथे काही वर्षे ते प्राचार्य पदावर कार्यरत होते. अधिकची संधी शोधत त्यांनी सरस्वती भवन वरिष्ठ महाविद्यालय औरंगाबाद येथे दीर्घकाळ सेवा केली. ते जरी औरंगाबादला स्थायिक होते तरी गावातील लोकांशी त्यांचा सतत संपर्क असायचा. कोणाचा मुलगा काय करतो आहे , त्याचे शिक्षण किती झालेले आहे याची ते माहिती घ्यायचे. त्याला कोणत्या क्षेत्रात संधी आहे ते पहायचे. त्या नुसार संबंधित विद्यार्थ्यास मार्गदर्शन करायचे. कोणत्याही कार्यात हातभार लावणे ही तर दादांची खूप जुनी सवय होती. त्यांनी आपल्या वागण्यातून एक आदर्श निर्माण करून दिला. औरंगाबादला एखाद्याचे काम असेल तर दादा स्वतः ते करून द्यायचे. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा,आपलेपणा, आत्मीयता, परिश्रम हे सर्व गुण दादांमध्ये ठासून भरलेले होते. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये शब्दानेही कोणाला दुखावले नाही. मला एक गोष्ट अजून स्पष्ट आठवते की दादा ज्यावेळेस गावात यायचे व त्यांची भेट त्यांचे गुरू पी .एस. पवार सर यांच्याशी होत असे त्या वेळेस दादा खाली वाकून पवार सरांच्या पाया पडायचे. मग ही भेट घरात, रस्त्यावर किंवा लग्नसमारंभात असो, कोठेही असो दादा नतमस्तक व्हायचे. हे पाहून कर्तुत्वाने खूप मोठा असणारा माणूस वर्तणुकीने किती विनम्र आहे हे दिसायचे. त्यांचे हे गुण पाहून आपणही असेच विनम्र वागावे असे मनोमन वाटत असे. तसा प्रयत्नही केला जायचा. गेल्या वर्षी माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा दादांनी माझी फोनवरून  सांत्वना केली होती. पण आज त्यांच्या परिवाराची सांत्वना कशी करावी हे मला समजत नाही. माझ्याकडे शब्द नाहीत. जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती जाणार आहे परंतु दादा खूप लवकर आपल्यातून निघून गेले याचे तीव्र दुःख होत आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तीची गरज गावाला, समाजाला व देशाला आहे. त्यांच्या निधनाने एक पोकळी निर्माण झाली आहे जी कधीही भरून निघणार नाही. शिक्षणाचा कसलाही वारसा नसताना, घरात मार्गदर्शन नसताना दादांनी यशाचे शिखर गाठले. नेहमी असं म्हटलं जातं की माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला महत्व आहे. निश्चितच दादा एक आदर्श जीवन व्यतित करून गेले. त्यांच्या कार्याचा सुगंध सतत दरवळत राहील. महाविद्यालयातही ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते.आपल्या सेवेत दरम्यान त्यांनी नेहमी वेळेचे बंधन पाळून अधिकाधिक ज्ञानार्जन करण्याचा प्रयत्न केला. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत केली. बालपणापासून खडतर परिश्रम करत त्यांनी एक आदर्श निर्माण करून दिला. आज रानमारे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.‌‌ दादांच्या निधनाने गावातील प्रत्येक व्यक्ती दुःखी झाला आहे. त्यांच्या कुटुंबाला किती दुःख झाले असेल याची कल्पनाही करवत नाही. ते आज आपल्यात नाहीत परंतु त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील. दादा आमच्यासाठी आदर्श होते व कायम आदर्शच राहतील. परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला दुःखातून सावरण्याचे बळ देवो हीच प्रार्थना...!



 श्रद्धांजली....!

 कृष्णचंद्र गाडेकर

टिप्पण्या

  1. दादा , आदर्श , प्रेरणादायी व्यक्तिमत्व आज आपल्यातुन निघून गेले , प्रकर्षाने आज आठवण याप्रकारे की, दादांच्या घरचे व आमच्या परिवाराचे घनिष्ठ संबंध होते. दादाचे माध्यमिक शिक्षण ते ज्युनिअर कॉलेज ( इ. 8वी ते 12 वी ) अंमळनेर (भां) येथे रयत शिक्षण संस्थेचे श्री गणेश विद्यामंदिर येथे आमच्या घरी कल्याण बापु व आजीसोबत राहून अतिशय हुषार विद्यार्थी राहून पूर्ण केले , दादांना आमच्या वरपे परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली .💐💐💐

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन