मनोजवं मारुततुल्यवेगं*
// *मनोजवं मारुततुल्यवेगं* //
-------------------------------------
*ब्रह्मचर्य, मांगल्य, बल आणि पवित्रता, यांची आदर्श मुर्ती म्हणजे हनुमान. आत्म्याची, ईश्वराची, रामाची प्राप्ती निर्बल करु शकत नाही, त्याच्या प्राप्तीसाठी शरीरबल, मनोबल, बुद्धीबल यांची गरज असते. हे हनुमंताने स्वत:च्या जीवनाव्दारे दाखवुन दिले. रामदासांनी गावोगावी आखाडे व व्यायामशाळा स्थापन केल्या, परंतु शक्तीने माणुस पशु किंवा राक्षस बनतो, ही गोष्ट ध्यानात घेऊन प्रत्येक गावात मारुती ची मंदिरे स्थापन केली. भक्तिमुक्त शक्ति माणसाला राक्षस बनवते तर भक्तियुक्त शक्ति माणसाला देवत्व प्राप्त करते.*
--------------------------------------
जगात सात चिरंजीवांपैकी ज्याची गणना आहे, अशा हनुमंतरायाचा चैत्र शुध्द पौर्णिमेला जन्म झाला. शंकराचे नंदीशिवाय मंदिर असु शकत नाही, तसे श्रीरामाचे देवालय हनुमंताच्या मुर्ती शिवाय असु शकत नाहीत. भक्ताशिवाय भगवान अपुरा या भावनेचे दर्शन यावरून होते.
विवेकी, विनयी, वाक्चतुर, जितेंद्रीय, स्थिरबुध्दी, समयसूचकता, कर्तव्यनिष्ठा, नि:स्वार्थी, वेदशास्त्रसंपन्न, निर्मोही, सामर्थ्यवान, नम्र, तल्लखबुध्दी, मानसशास्त्र, राजनीती, तंत्रज्ञान अशा शास्त्राचे ज्ञान प्राप्त करणा-या हनुमंताने प्रभु रामचंद्रांच्या मुखातून पुरुषोत्तम ही पदवी प्राप्त करुन , प्रभु कडून स्वत: बरोबरचे स्थान प्राप्त केले.
इंद्रजितासारख्या बाह्य शत्रूला तर त्याने जिंकलेच होते , पण मनातील काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर इत्यादी असुरांनाही त्याने जिंकले होते. भगवान रामासारखा खजिना ज्याला प्राप्त झाला, त्याला सुखसंपत्तीचा मोह कसा होणार. स्वत: जे कांही केले ते प्रभुरामचंद्रामुळेच झाले आहे. अशी अंत:करणापासुनची भावना जिथे असेल, तिथे अभिमान कोठून संभवेल.
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रिय बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये।।
हे हनुमंताचे संक्षिप्त वर्णन आहे. हनुमान बल संपन्न होता. त्याच्या कडे मानसशास्त्र, राजनीती, तत्वज्ञान वगैरेचे सखोल ज्ञान होते. त्याला अकरावा रुद्राचा आवतार मानण्यात येतो. हनुमंताचे चरित्र जर वाचन केल, तर त्याचे कडे फार मोठी विद्वत्ता होती. तो 'बुद्धिमत्तांवरीष्ठम् ' होता. त्याची वक्तृत्व शक्ति अजब होती. रामायणात हनुमंताचे वाणीतून ज्ञानाचा प्रवाह वाहतो असे वाटते.
आजही जनसमुदायाच्या -हृदयात शक्ति आणि भक्तीची देवता म्हणून हनूमंताचे स्थान आहे. म्हणूनच हनुमान जयंती साजरी केली जाते.
भगवानसे भक्त बडे कर गये
संत सुजाण।
पुल बांध रघुवीर चले और कूद गये हनुमान।।
रामायणातील सुंदरकांड हनुमंताच्या लीलांनी भरलेला आहे. भक्तांच्या लीला प्रभुंना व ऋषींना सुंदर वाटतात, म्हणून या कांडाला सुंदरकांड म्हणतात. लंकादहन ही काही हनुमंताची माकडचेष्टा नव्हती, तर राजकारण विशारदाचे पुर्ण विचार करुन केलेले ते एक कृत्य होते. लंका दहनातील लीलांनी लंकेतील सर्व राक्षसांचे मनोधैर्य खचवून व लंकादहन करुन हनुमंताने एका अर्थाने युद्धाचे काम पुर्ण केले.
हनुमान रामाचा भक्त होता. तसाच तो 'बुद्धिमत्तां वरीष्टम् ' असल्यामुळे राम नाजुकातील नाजुक काम हनुमंताकरवी पार पाडत असत. रावणाला मारल्यानंतर सीतेला संदेश पोहचविणेसाठी राम हनुमंताला सीतेकडे पाठवतात. अयोध्येला प्रवेश करण्यापूर्वी भारताच्या चेह-यावर आनंद होतो की दू:ख हे पाहण्यासाठी राम हनुमंताला आधी अयोध्येला पाठवतात.
हनुमंताची भक्ति आतिशय उत्कट आहे. राम हनुमंताला विचारतात तुला काय पाहिजे? त्यावेळी हनुमान मागतात, माझी तुमच्या विषयीची प्रेमभक्ती कधीही कमी न व्हावी,आणि रामाशिवाय माझ्या मनात दूसरा भाव न निर्माण व्हावा, ऐवढेच मला पाहीजे. जो पर्यंत रामकथा आहे, तो पर्यंत हनुमान आहे.
कुलं पवित्र जननी कृतार्थ वसुंधरा पुण्यवतीच येन।
धन्य ती अंजनीमाता, धन्य तो हनुमान. हनुमान म्हणजे दास्य भक्तिचा आदर्श. दास्यमारुती आणि वीरमारुती या दोन्ही पैकी कोणते संबोधन पसंत कराल? त्यावेळी मारुतीरायाने दास्य भक्तीला महत्व दिले. रावणाला जिंकणारा तो वीर होता आणि रामाला जिंकणारा तो दास होता, म्हणून तो वीर ठरला.
हनुमान म्हणजे सेवक आणि सैनिक यांचा सहयोग, भक्ति व शक्ति यांचा सुरेख संगम. रामायणात हनुमंता इतकाच रावण बलवान होता. रावणाने आपले बल भोगाला अर्पण केले तर हनुमंताने त्यागाला अर्पण केले. एकाने रामपत्नी पळवून नेली तर दूस-याने ती आणुन दिली.
भक्तिमुक्त शक्ती माणसाला राक्षस बनवते तर तर भक्तियुक्त शक्ति माणसाला देवत्व प्राप्त करुन देते. याचे वर्णन वाल्मीकींनी रामायणाच्या रूपातून केले आहे. निष्काम कर्मयोगी भक्त रामदासच बनतो. ही गोष्ट रावण आणि हनुमान यांच्या जीवनातून आपणास समजते.
हनुमान ब्रम्हचर्य, बलवान, मांगल्य, पवित्रता यांची आदर्श मुर्ती आहे. आत्म्याची, ईश्वराची, रामाची प्राप्ती निर्बल करु शकत नाही, त्यासाठी शरीरबल, मनोबल, बुद्धीबल याची गरज असते, हे हनुमंताचे जीवनचरित्रातुन दिसुन येते. रामदासांनी गावोगावी आखाडे व व्यायामशाळा स्थापन केल्या होत्या. परंतु शक्तीने माणुस पशू किंवा राक्षस बनतो, ही गोष्ट ध्यानात घेऊन प्रत्येक गावात मारुतीची मंदिरे स्थापन केली. प्राप्त केलेली शक्ति रावणाप्रमाणे रामाच्या विरोधासाठी न वापरता, ती हनुमंताप्रमाणे भगवद्कार्यात वापरली पाहीजे, याचे दर्शन रामायणातुन दिसुन येते.
आज आपल्या धनाचा, ज्ञानाचा आणि शक्तिचा वापर अवकल्याणासाठी न करता तो प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी जर केला, तरच आपण ख-या अर्थाने हनुमान जयंतीचे अधिकारी आहोत.
*अनंत भ.कुलकर्णी*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा