"मानेंच्या पत्रात पडळकरांचा राम राम"

"मानेंच्या पत्रात पडळकरांचा राम राम" 
सांगली जिल्ह्य़ातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ हे तालुके कायम दुष्काळाच्या परछायेत वसलेले.. 
जत तालुक्यातील वाशान गांवचे अण्णासाहेब माने हे गावात हाताला काम मिळत नाही म्हणून सांगलीतील वानलेसवाडीत वास्तव करुन मिळेल तिथे हमालीचं काम करु लागले. त्यांचा थोरला मुलगा विष्णू हा शिक्षण घेत-घेत मिळेल ते काम करून दोन पैसे मिळवून वडिलांच्या संसार गाड्याला हातभार लावू लागला. बहुजन समाजातील गोरगरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी राजकारणात आले पाहिजे, असे विष्णू मानेंना वाटु लागले म्हणून विष्णुंनी राजकारणात उडी घेतली आणि जनसेवेला झपाटय़ाने सुरुवात केली.
त्यावेळेस सांगलीची वानलेसवाडी ही स्वतंत्र ग्रामपंचायत होती.
त्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वडील अण्णासाहेब मानेंना उभे केले, तिथे त्यांचा अल्पशा फरकाने पराभव झाला. मात्र, पराभव झाला म्हणून शांत बसेल तो विष्णू कसला...?
काही वर्षांनी म्हणजे २००३ साली वानलेसवाडीचा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत समावेश झाला. महानगरपालिकेच्या निवडणुकीत विष्णू माने हे स्वतः उभे राहिले आणि यावेळीही ते पराभूत झाले. पण खचून न जाता त्यांनी जनसेवेचा अवाका पुन्हा जलदगतीने सुरूच ठेवला. पुढे २००८ साली लागलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत विष्णू माने पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले आणि मतदारांनी त्यांना त्यांच्या अखंडित जनसेवेची पावती म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. 
मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत विष्णू माने यांनी संधीचे सोने केले आणि आजतागायत जनतेच्या बळावर कार्यसम्राट नगरसेवक म्हणून ते काम करत आहेत. 
पहिल्या निवडणुकीत २००८ मध्ये विजयी झाल्यापासून विष्णू माने हे लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत आले आहेत. रघुवंश सोसायटी कडून जागा मिळवण्यापासून ते आज स्मारक उभारणीपर्यंत अखंडित पराकोटीचे प्रयत्न त्यांना करावे लागले. त्यांच्या अविरत प्रयत्नांना यशही आले असून परवा २ एप्रिल २०२२ शनिवारी रोजी लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण होणार आहे. विष्णू माने ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष आहेत त्या पक्षाचे सर्वेसर्वा मा. शरद पवार साहेब यांच्या हस्ते लोकार्पण सोहळ्याचे आयोजन केले आहे. 
आता प्रश्न हा आहे की, विष्णू माने यांनी या पुतळा उभारणीसाठी १३ वर्षे झटून झगडुन पुतळा व स्मारक उभारले असल्याने स्मारकाचे अनावरण कोणाच्या हस्ते करायचे! हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार कार्यसम्राट नगरसेवक मा. विष्णुजी मानेंना आहे असे असताना हा पुतळा अनावरण कार्यक्रमावरून इतर पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोटसुळ का उठला आहे, हे समजायला मार्ग नाही. मी त्या दोन्ही पक्षाचा हितचिंतक किंवा प्राथमिक सदस्य पण नाही, पण सत्य लोकांसमोर आणणे हे माझे सामाजिक कृतव्य समजून मी हा शब्दप्रपंच आपल्या समोर मांडत आहे.
विष्णू माने हे एका मिळेल तिथे काम करणार्‍या हमालाचं (माथाडी कामगाराचं नव्हे!) पोरगं आणि कार्यक्रमाला पवार आले नाही पाहिजेत म्हणून विरोध करणारे एका सक्षम पगार घेणाऱ्या शिक्षकांचं पोरगं.. 
विष्णू माने चार वेळा जनतेतून निवडून आलेलं नगरसेवक आणि स्मारकाच्या प्रमुख पाहुण्यांना विरोध करणारे एकदाही जनतेतून निवडून न आलेलं व्यक्तीमत्व... 
विरोध कुठे आणि कसा करावा हेच कळत नसेल तर काय उपयोग ? जिथे लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचे स्मारक किंवा पुतळा उभारला जातोय तिथेच विरोध का? 
दुसऱ्या कार्यक्रमासाठी पवार साहेब काय सिल्वर ओक सोडून बाहेरच येत नाहीत का? तिथे विरोध का करत नाहीत! 
जेजुरीच्या पुतळा उभारणीसाठी प्रयत्न संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड यांनी केले, मात्र पुतळा अनावरनाचा कार्यक्रम उधळून लावण्यासाठी आणि स्वतःच्या हाताने उद्घाटन करण्यासाठी यांनी जंग जंग पछाडले!
या साऱ्यात फडणवीसांची मोठी कपटनीती आहे आणि हे राज्यातील वैचारिक व उच्चशिक्षीत जमातीच्या लोकांच्या लक्षात आले आहे. एखाद्या समाजातील कार्यक्रम असेल तर त्याच समाजाच्या एखाद्याला हाताशी धरून त्या महापुरुषांच्या सोहळ्याच्या कार्यक्रमात कसा बट्ट्याबोळ करायचा ते फडणवीसांकडुन शिकले पाहिजे! असे म्हणटले तरी वावगे ठरणार नाही. 
मात्र चार पक्ष बदलुन मोफत आमदारकी मिळालेल्या पडळकरांनी व त्यांच्या बुध्दी गहाण ठेवलेल्या अर्धवटरावांनी त्यांच्या स्वयंघोषित नेत्यांनी धनगर समाजाच्या किती महापुरुषांची नावे चौकाला, रोडला दिलेत, किती स्मारके, किती पुतळे आपण उभारलेले आहेत याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. सांगलीचे नाक असलेल्या कलेक्टर कार्यालयासमोरच्या चौकाला "यशवंतराजे होळकर चौक" हे नाव प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन देणे एवढे सोपे आहे का, हे पडळकरांनी अंतःकरणाला विचारुन बघावे. त्या चौकाला नाव देण्यात मा. विष्णुजी माने साहेब, मा. निवांत कोळेकर सर, मा. भारत व्हनमानेंचा सिंहांचा वाटा आहे?
पडळकर साहेब, धनगर समाजाच्या भावनिक विषयाला हात घालुन धनगर समाजाचा अखेरचा लढा म्हणून महाराष्ट्रभर हॅलीकॅप्टरने फिरलात, आम्हालाही आनंद वाटला होता. तुम्ही सर्टिफिकेट (प्रमाणपत्र) मिळवून देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, वगैरे वगैरे वल्गना करत हिंडत होता. पण जशी तुम्हाला मागच्या दारातून आमदारकी मिळाली तसा तो आरक्षण लढा पण विसरलात आणि समाज पण विसरलात. आता तुमचं जेजुरीच्या लोकमाता अहिल्यादेवी होळकर पुतळा अनावरण आणि सांगलीच्या अहिल्यादेवींच्या स्मारकात धुडगूस घालण्यापुरतेच सामाजिक काम उरले की काय, असा संशय माझ्या सारख्या शेकडो बुद्धी गहाण न ठेवलेल्या सत्यशोधक सर्वसामान्य समाज बांधवांना पडू लागला आहे! 
मी पण शरद पवारांना किंवा भाजपच्या कोणत्याही नेतृत्वाला न मानणारा सर्वसामान्य शेकापचा कार्यकर्ता आहे. म्हणून मी काय ऊठसूट कोणाच्याही नावाने शिव्यांची लाखोली वाहत बसत नाही! 
आपल्याला मिळालेल्या आमदारकीचा उपयोग समाजहितासाठी करण्याची गरज आहे. मात्र तुम्हाला आमदारकी मिळाल्यापासून वंचित समाजाला न्याय देण्याऐवजी, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न मार्गी लावण्याऐवजी त्यांच्या हातात दगड देत आहात. समाजाच्या अशा सुशिक्षित तरुणांवर उद्या गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांचे भवितव्य अंधारात जाणार आहे त्यांचे काय ? उद्या हीच पोरं तुरुंगात गेली तर तुम्ही त्यांच्याकडे पाठच फिरवणार, याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे. कारण, जो माणूस बिरोबाची शपथ घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी समाजाला फसवू शकतो, तो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फसवायला कधीच मागेपुढे पहाणार नाही, हे तितकेच खरे आहे. मात्र, तुमच्या या नुसत्या रिकाम्या उठाठेवी मुळे कदाचित तुम्हाला भाजपकडून बक्षिसी म्हणून पुन्हा आमदारकीची लॉटरी लागेल आणि पेन्शनचा माध्यमातून तुमची आयुष्यभराची पेंशनच्या माध्यमातून सोय होईल. परंतु यासाठी जर तुम्ही समाजातील गोरगरिबांच्या पोरांचा शिडीसारखा वापर करणार असाल, त्यांच्या आयुष्याचं मातेरं करण्याचा खेळ खेळणार असाल तर तुम्ही फसवणूक केली तरी कदाचित बिरुबा तुम्हाला माफ करेल, मात्र समाज कधीही माफ करणार नाही, हे विसरू नका. म्हणून तुमच्या राजकारणापायी, धनगर जमातीच्या आणि बहुजन समाजाच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा ढाल म्हणून वापर करू नका. धनगर जमात गरीब आहे, जमातीतील बांधवांचे प्रश्न अनेक आहेत, त्यांना न्याय कसा देता येईल ते पहा. मात्र, तसे न करता आपण उलट वागत आहात. आपल्याला आमदारकी दिली म्हणून इतके लाचार होऊ नका की, तुम्ही कधी फडणवीसांच्या इशाऱ्यावर नाचायला लागले, त्यांना खुश करण्यासाठी त्यांच्या विरोधकांच्या नावाने गरळ ओकून नेतृत्वाला खूश करून अज्ञाधारकाची भूमिका पार पाडू नका यात, सुशिक्षित, अशिक्षित, अज्ञानी, मागासलेल्या धनगर जमातीच्या बांधवांना तुमच्या या राजकीय लपंडावात नाही तर त्यांच्या महापुरुषरुपी प्रेरणास्थानात रस आहे, त्यांचे प्रश्न, समस्या सोडवणाऱ्या नेतृत्वाची त्यांना गरज आहे. दुसऱ्याच्या इशाऱ्यावर धावुन जाणारे, पुढे पुढे करणारे आणि हल्ला कर म्हटले की हल्ला करणारे नेतृत्व नको आहे, त्यापेक्षा धनाच्या धनगरांना पैशाने गरीब असलेले नेतृत्व चालेल पण स्वाभिमानाची श्रीमंती असलेलं नेतृत्व हवे आहे याचे पडळकर साहेब भान असु द्यावे हिच अपेक्षा... 

   - भाई आकाश निर्मळ
(लेखक भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती कमेटी सदस्य आहेत)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन